बेल्हे- जांबूतफाटा रस्त्याचे काम निकृष्ट; दोन वर्षात रस्त्याची दुरावस्था
1 min read
बेल्हे दि.३:- बेल्हे ते जांबूत फाटा सुमारे १४ किलोमीटर चा हा रस्ता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. पुणे-अहिल्यानगर या जिल्ह्यांना जोडणारा हा अंत्यत जवळचा मार्ग असल्याने नेहमीच या रस्त्यावरून उसाची व जडवाहनांची नेहमी वर्दळ असते. या रस्त्याचे काम दोन ते तीन वर्षांपूर्वी झालेले असताना. दोन वर्षांत या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्डयांमध्ये रस्ता असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. नारायणगाव येथे टोमॅटो मार्केट साठी मोठी ये जा वाहनांची या रस्त्याने असते. जांबुत फाटा ते तांबेवाडी पर्यंत या रस्त्याला अनेक खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तर दुचाकी स्वरांना या खड्ड्यांमुळे मणक्याचे त्रास उद्भवत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. येथील रस्त्यावर जागोजागी अनेक लहान मोठे खड्डे आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालकांचा तोल जाऊन
अनेक लहान मोठे अपघात होऊन कित्येक जण गंभीर जखमी झालेले आहेत. बेल्हे ते जांबूत फाटा हा रस्ता जवळपास १४ ते १५ किलोमीटरचा असून या रस्त्याच्या कडेला असलेली भोरवाडी, साळवाडी, नगदवाडी, बोरी बुद्रूक,
तांबेवाडी या गावांमधील ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी सुद्धा केली असून प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया
“बेल्हे ते जांबूत रस्त्याच्या कामाला फक्त दोन ते तीन वर्षे झालेले असताना हा रस्ता उखडला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून हे खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी वारंवार केलेली असताना देखील या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने लवकरच या ठिकाणी असलेल्या खड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येणार आहे.”
– सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते