वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम,जुन्नर यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजन
1 min read
चाळकवाडी दि.३:- गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाळकवाडी येथे वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम, जुन्नर यांच्या वतीने सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्पमित्र आकाश माळी, दीपक माळी, हेमंत घाडगे आणि आदित्य हांडे यांनी सहभाग घेत सर्प जनजागृतीपर माहिती दिली.कार्यक्रमामध्ये प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उपस्थित ग्रामस्थांना सर्पांचे जीवन, त्यांचे महत्त्व, सर्पदंश झाल्यास तात्काळ घ्यावयाची काळजी, तसेच अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. सर्पमित्रांनी सर्प पकडण्याचे सुरक्षित मार्ग, विषारी व बिनविषारी सर्पांची ओळख याविषयी सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमाचे आयोजन चाळकवाडीचे पोलीस पाटील संतोष सोनवणे आणि प्रविण सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सर्पांविषयीचे गैरसमज दूर केले.
या जनजागृती उपक्रमामुळे गावामध्ये सर्पांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, सर्पमित्रांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.