कल्याण – नगर महामार्गावर आळेफाट्याजवळ भीषण अपघात; तीन मजूर जागीच ठार

1 min read

आळेफाटा दि.८ :- मोटारसायकल व टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत मोटारसायकलवरील तिघे जागीच ठार झाले असून ही घटना बुधवार (दि. ७) रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास आळेफाट्याजवळ असणाऱ्या वडगाव आनंद गावच्या शिवारात चौगुले वस्तीजवळ घडली.

अपघातग्रस्त प्रवाशी परप्रांतीय असून, आळेफाटा येथे बेकरीत कामानिमित्त आलेले आहेत. योगेश रामकुमार (वय २१), चाहात बाबुराव (वय १७) आणि संजीव कुमार (वय २४, सर्व राहणार उत्तरप्रदेश) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आळेफाटा येथे , असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसने (एमएच ०४ एचवाय ८७३०) दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागेवरच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे