विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

1 min read

साकोरी दि.२:- विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा, आत्मविश्वासाचा नवा किरण देणारा आणि शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरतं न राहता एक सुंदर अनुभव कसा बनू शकतो, हे सांगणारा एक संस्मरणीय क्षण वि‌द्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पीएम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये घडला.प्रा. मुबीन तांबोळी सरांचे “करिअर मार्गदर्शन आणि अभ्यास कौशल्य” या विषयावर दिलेले दोन तासांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी केवळ मार्गदर्शन नव्हते, तर आत्मचिंतन, प्रेरणा आणि हास्याच्या फुलांनी सजलेली एक आनंदयात्रा होती. प्रा. तांबोळी यांनी “Read before teaching आणि Read after teaching” या अभ्यास तंत्रांचा उपयोग किती प्रभावी आणि सोपा असू शकतो, हे खुसखुशीत शैलीत उलगडून दाखवले. मुलांमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी करता येतो, आत्मविश्वासाची बीजं कशी रोवता येतात, आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणते विचार आणि सवयी अंगीकाराव्यात हे त्यांनी सहज संवाद, गाणी आणि हास्यविनोदातून सांगितले.त्यांच्या सादरीकरणात कुठेही उपदेशकाचा रुक्षपणा नव्हता, उलट ते एक स्नेही मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनाशी संवाद साधत होते. गाणी, गोष्टी, विनोदी किस्से आणि प्रेरणादायक विचार यांची सरमिसळ करत त्यांनी प्रत्येक वि‌द्यार्थ्याच्या मनात नवा उजेड पेरला.या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे, वि‌द्यानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूलच्या प्राचार्या रुपाली भालेराव, पीएम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे, यांनीही आपली उपस्थिती आणि मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजू जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले.या वेळी दोन्ही शाळांमधील वि‌द्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रा. तांबोळी सरांचे आभार मानत, एक नव्या ऊर्जेने भरलेली प्रेरणादायी आठवण आपल्या मनात कायमची साठवली.प्रा. मुबीन तांबोळी यांचे अनुभव, सहज शैली आणि प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळासाठी सकारात्मक ठसा उमटवणारे ठरले.अशा प्रकारचे मार्गदर्शन नियमितपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून, शिक्षण संस्थांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे, अशी भावना उपस्थित शिक्षक व पालकांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आणि प्रा. तांबोळी यांचे आभार मानण्यात आले. हे सत्र विद्यार्थ्यांसाठी एक नवीन विचारांची पहाटठरली, ज्यातून त्यांना स्वतःच्या स्वप्नांची उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!