मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
1 min read
मुंबई दि.१:- मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे.वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या एग्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कर्करोगाशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. मीरारोडमध्ये राहत्या घरात तिने शेवटचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी एक तरुण अभिनेत्रीने घेतलेल्या एग्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहे.चार दिवस सासुचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी, या सुखांनो या, या मालिकांमध्ये प्रिया मराठेने भूमिका साकारली होती. मालिका क्षेत्रातून प्रियाने मोठं नाव कमावलं आहे.
वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिने घेतलेल्या एग्झिटमुळे मराठी अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. प्रिया मराठे हिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अनेक हिंदी मालिकांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. हिंदीतील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता यातील कामामुळे ती घराघरांमध्ये पोहोचली होती.
2012 मध्ये तिने शंतनु मोघे या अभिनेत्यासोबत लग्न केलं होतं. प्रिया मराठे हिचा पती शंतनु मोघे याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जात होतं.या सुखांनो या’ या मालिकेतून तिने टीव्ही विश्वात पदार्पण केलेले.
त्यानंतर प्रियाने ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती.
तिची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील मोनिका तुफान गाजली, पण ही मालिकाही तिने अर्ध्यात सोडली होती. याशिवाय ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
प्रतिक्रिया
“प्रख्यात अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ‘गोदावरी’ तर ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत ‘रायबाघन’ या भूमिका जिवंत केल्या. प्रिया मराठे या हिंदी मालिकांमध्येही कार्यरत होत्या. त्यांनी ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथीयॉं’ या मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. त्या गेल्या वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत होत्या. परंतु ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे त्यांचे पती शंतनु आणि परिवाराला झालेल्या असीम दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.”
डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिरूर लोकसभा