‘शिवनेरी एक्सप्रेस’ च्या दणक्याने कल्याण- अहिल्यानगर महामार्गाचे काम सुरू

1 min read

बेल्हे दि.३१:- ‘कल्याण- अहिल्यानगर महामार्गाचे सिमेंट काँक्रीट चे काम एक महिन्यापासून बंद; वाहनधारकांची तारेवरची कसरत’ या मथळ्याखाली शिवनेरी एक्सप्रेसने दिनांक 27 ऑगस्ट रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत महामार्ग प्रशासनाने रविवार दिनांक 31 रोजी तातडीने महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटचे काम पुन्हा हाती घेतले आहे. सुमारे एक महिन्यापासून हे काम बंद अवस्थेमध्ये होते. यामुळे वाहन चालकांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत होती. महामार्गाच्या साईट पट्ट्यांचे खड्डे बुजण्याचे काम तात्काळ महामार्ग प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे शिवनेरी एक्सप्रेसचे वाहन चालकांनी व स्थानिकांनी आभार मानले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण- अहिल्यानगर महामार्गाचे काम ओतूर ते आळेफाटा दरम्यान पूर्ण झाले आहे. सध्या आळे ते बेल्हे दरम्यान सुरू असलेले काम गेल्या एक महिन्यापासून बंद स्थितीमध्ये होते. त्यामुळे या महामार्गावर सतत ट्रॅफिक जाम होत होते. रस्त्याच्या या महामार्गाचे काम आळे ते गुंजाळवाडी पर्यंत जवळपास झाले आहे. गुंजाळवाडी पासून बेल्हे पर्यंत हे काम गेल्या एक महिन्यापासून बंद व अर्धवट स्थितीमध्ये होते. त्यामुळे एक बाजूचा कामासाठी डांबरी रस्ता उकरल्याने येथे गाडी व्हायबल होऊन दुचाकी स्वारांचे वारंवार अपघात होत होते. दुसऱ्या बाजूचे सिमेंटचे काम काही ठिकाणी झाले आहे तर काही ठिकाणी अपूर्ण आहे. अरुंद रस्ता असल्याने वाहनांना ये जा करण्यास मोठा अडथळा होत होता. दोन मोठ्या वाहनांना वाहन क्रॉस करण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळे वाहन चालकांमध्ये वाद होत होते. बेल्हे ते आळेफाटा दरम्यान या मार्गाने मोठी वाहतूक कोंडी असते. रांजणगाव एमआयडीसीला दिवसभरात हजारो वाहने या महामार्गावरून जातात. सदर घटनेची दखल घेतली शिवनेरी एक्सप्रेस ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावर महामार्ग प्रशासनाने मशीन बंद असल्याचे सांगितले होते. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांत मशीन काम करण्यासाठी दुरुस्त होऊन आले. रविवार दिनांक 31 ऑगस्ट पासून हे काम सुरू झाले असून लवकरात लवकर काम पूर्ण होऊन वाहतुकीच्या कोंडी मधून प्रवाशांची व वाहनचालकांची सुटका होईल अशी आशा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!