अनैतिक सबंधाला विरोध करणाऱ्या बापाचा आई व प्रियकराच्या मदतीने खून; २३० सीसीटीव्ही चेक करून पोलिसांनी केला तपास; या घटनेने पुणे हादरले

1 min read

पुणे दि. ६ :- पुणे जिल्हा हादरून टाकणारी घटना पोलिसांनी उघड केली असून आपल्या अल्पवयीन मुलीचं सोसायटीतल्याच एका जणाशी अनैतिक संबंध आहेत; हे आईला माहीत होतं; पण बापाला ते पटत नव्हतं. बापाचा या सगळ्या गोष्टीला विरोध होता. हा विरोध मोडीत काढण्यासाठी पोरीच्या प्रियकराने आणि पोरीच्या आईने संगनमत करून पोरीच्या बापालाच संपवलं.पुरावा नष्ट करण्यासाठी सोसायटीतून गाडीत प्रेत टाकून सणसवाडी शिरूरच्या हद्दीत या प्रेताला पेटवून दिलं.अवघ्या पाच दिवसांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूरच्या पोलिसांनी यातील आरोपींना पकडलं आणि एक भयानक प्रकार आज समोर आला आहे.

याबाबत सविस्तर घटनाक्रम असा की, एक जून रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर पोलिसांचे हद्दीतील सणसवाडी येथे पुणे-अहमदनगर महामार्ग लगत गवारे एचपी पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे प्रेत पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना समोर आली होती. मृतदेह संपूर्ण जळाला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते, पण पोलिसांनी हा प्रकार शोधून काढण्यासाठी तब्बल 230 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

दोन दिवस हे शोध कार्य चालले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांनी यामध्ये लक्ष घातले आणि या संदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर व शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काही पोलीस पथके तैनात करण्यात आली.

या तपासा दरम्यान शिक्रापूर ते चंदननगर, वडगाव शेरी, पुणे अशा ठिकाणी 230 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. मग या गुन्ह्यामध्ये व्हॅगनार त्या मारुती कारचा सहभाग असल्याचे दिसून आले. मग हे वाहन तपासण्यात आले. हे वाहन वडगाव शेरीतील साईकृपा सोसायटीतील जॉय कसबे हा वापरत असल्याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, त्याचा मुलगा अल जॉय कसबे याच्यापर्यंत पोलिस पोचले. तोच ही व्हॅगनार गाडी घेऊन गेला होता असे दिसून आले.

मग त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर सेंड्रा जॉन्सन लोबो (वय 43 राहणार ए 16 तिसरा मजला गुडवील वृंदावन आनंद पार्क वडगाव शेरी पुणे) व तिची अल्पवयीन मुलगी यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे सांगितले अर्थात त्यानंतर पोलीस मृत व्यक्तीच्या ओळखीपर्यंत पोहोचले ती मृत व्यक्ती होती जॉन्सन कॅजिटल लोबो !

जॉन्सन लोबो हा सँड्रा हिचा पती असून अल हा सेंड्रा आणि जोसेफ यांच्या मुलीचा प्रियकर आहे. त्यांच्या प्रेम संबंधाला सँड्रा हिची मान्यता होती. मात्र जॉन्सनला हे मान्य नव्हते. त्यामुळे जॉन्सनचा काटा काढण्यासाठी या तिघांनी संगनमत करून जॉन्सनचा खून केला. यासाठी वेगवेगळ्या क्राईम वेब सिरीज पाहिल्या व कट रचला.

30 मे 2023 रोजी रात्रीच्या वेळी जॉन्सनच्या डोक्यात वरवंटा घालून व त्याच्या मानेवर चाकूने वार करून त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह घरातच ठेवला. त्यानंतर 31 मे 2023 रोजी रात्रीच्या वेळी व्हॅगनार गाडीमध्ये टाकून संबंधित ठिकाणी नाल्यात त्याचा मृतदेह टाकला व त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिले. दरम्यान जॉन्सनचा खून केला आहे हे समजू नये म्हणून त्याचे व्हाट्सअप स्टेटस दररोज ठेवले जात होते. चार जून रोजी सँड्राचा वाढदिवस असल्याने आरोपी अंगनेल कसबे याने जॉन्सनच्या मोबाईलवरून पत्नीच्या वाढदिवसाच्या स्टेटस ठेवले, जेणेकरून तो जिवंत आहे असे सर्वांना भासावे, मात्र पोलिसांनी हा सगळाच प्रकार उघडकीस आणला.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, प्रमोद क्षीरसागर, वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमोल खटावकर, तुषार अंधारे, जितेंद्र पानसरे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, विकास पाटील, शिवाजी चितारे, मुकुंद कदम, निखिल रावडे, किशोर शिवणकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे