शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे की विलास लांडे? शरद पवार यांनी या वादाला दिला आज पूर्णविराम

पुणे दि.५: – विलास लांडे यांनी शिरुर लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितल्याने शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, अशी चर्चा काही दिवसापासून सुरु होती. या चर्चेला आज शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.
“विद्यमान खासदार डाँ. अमोल कोल्हे हेच शिरुरमधून लोकसभा लढवतील,” असे शरद पवार यांनी जाहीर केले. त्यानंतर “निवडणूक लढविण्यासाठी मी फक्त इच्छा व्यक्त केली होती, पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे,” असे विलास लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.त्यामुळे लांडे कि कोल्हे या वादावर पडदा पडला आहे.
आठ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीबाबत आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीत डाँ. अमोल कोल्हे , विलास लांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विरोधीपक्ष अजित पवार यांनी आजच्या बैठकीत कार्यक्रर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. बैठकीत अजितदादांनी जोरदार फटकेबाजी करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला. ” उमेदवारीच्या तिकीटावरुन वाद नको, त्यावरुन भांडलात तर याद राखा,” अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.
मी फक्त इच्छा व्यक्त केली होती : लांडे
” शरद पवार आणि अजित पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार अजून वर्ष बाकी आहे. त्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची याबाबत अजून कुठेही स्पष्ट झालेले नाही, मात्र पक्षाची जबाबदारी दिली ती मी पार पाडेन. अमोल कोल्हे यांनी आता वर्षभरात त्यांचा जनसंपर्क वाढवावा आणि निवडणुकीला लोकांसमोर जावे,” असे लांडे म्हणाले.