महाराष्ट्रातील १५ सरपंच दिल्लीतील स्वातंत्र्यदिनी सोहळ्यात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

1 min read

नवीदिल्ली दि.१४:- राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १५ सरपंचांचा समावेश असून यात ९ महिला सरपंच आहेत. १५ ऑगस्ट रोजी हे सर्व सरपंच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे. या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच पुढीलप्रमाणे : प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, ता. कामठी, जि. नागपूर), संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे), डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, ता.अकोला, जि. अकोला), नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे), सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम), अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली), संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया), रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा), सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी), पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी), प्रमोद किसन जगदाळे (बिदल, ता. मान, जि. सातारा), शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती), प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर) असे एकूण १५ सरपंच आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!