पेमदरा गावात कला केंद्राला पूर्वी दिलेली परवानगी विशेष ग्रामसभेत एकमताने रद्द
1 min read
पेमदरा दि.१४:-पेमदरा (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीने यापूर्वी कला केंद्राला परवानगी दिली होती, ती परवानगी बुधवारी (दि.१३) ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने नाकारण्यात आली. या ग्रामसभेला नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सरपंच जयश्री गाडेकर यांनी पेमदरा ग्रामस्थांची पेमदरा हद्दीमध्ये कला केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली होती.त्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी बुधवारी विशेष ग्रामसभा बोलवली होती, ही ग्रामसभा दुपारी १२ ते ३ अशी तीन तास चालली, त्यात यापूर्वी दिलेल्या कला केंद्राची परवानगी रद्द करण्यात आली आहे.
या वेळी ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे पेमदरा ग्रामपंचायत हद्दीमध्ये कला केंद्रास अनुमती का दिली? असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये पेमदरा हद्दीत नव्याने कला केंद्र नकोच, असे म्हणत यापूर्वी दिलेली परवानगी आता एकमताने रद्द करण्यात आली.
या ग्रामसभेला सरपंच जयश्री गाडेकर,उपसरपंच बाळासाहेब दाते, ग्रामसेवक सचिन शिंदे यांच्यासह
ग्रामपंचायत सदस्य,सुनील महाराज बेलकर, संदीप बेलकर, संजय दाते, महादू दाते, प्रदीप बेलकर, हनुमंत दाते, बंडू आहेर, रंगनाथ बेलकर, संतोष बेलकर पाटील, प्रभाकर दाते, आनंद वेलकर,
तसेच कला केंद्राच्या प्रमुख रेखा मुसळे व त्यांचे सहकारीही उपस्थित होते.ग्रामसभेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पेमदरा येथे दोन अधिकारी,चार पोलिस कर्मचारी व दोन महिला कर्मचारी तैनात ठेवले होते.
प्रतिक्रिया
“पेमदरा हद्दीमध्ये संबंधित व्यक्ती नेमकं काय सुरू करणार आहे कला केंद्र म्हणजे काय? याचा पूर्वकल्पना मला नसल्याने व गावाला उत्पन्न वाढेल या हेतूने पेमदरा गावचे हद्दीमध्ये कला केंद्र सुरू करण्यासंदर्भात संमती दिली होती, परंतु ग्रामस्थांचा या कला केंद्राला विरोध वाढला, त्यांची जी भूमिका आहे, तीच माझीही आहे, त्यानुसारच ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली.”
जयश्री गाडेकर, सरपंच
प्रतिक्रिया
पेमदरा गावात दारू चे अनेक दुकाने आहेत आधी त्यांचे परवाने ग्रामपंचायतीने रद्द करावेत. कला केंद्रात वाईट धंदे चालत नाहीत. कला केंद्रात स्थानिक गावातील व्यक्ती येत नाही, बाहेरचे लोक येतात.त्यासाठी कला केंद्र सुरू झाल्यावर गावातील कोणत्याही व्यक्तीला कला केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.आधार कार्ड पाहूनच आत सोडले जाईल.
रेखा मुसळे
कला केंद्र चालक
