पिकअप चालकांना ओतूर पोलिसांचा कडक शब्दांत इशारा; अन्यथा कठोर कारवाई
1 min read
ओतूर दि.११:- बेदरकारपणे पिकअप चालवणाऱ्या चालकांना ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘पिकअप चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे आणि कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी करू नये. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि शहराबाहेरील रस्त्यांवर पिकअप वाहनांची संख्या वाढली आहे. अनेक तरुण पिकअप चालक मालवाहतुकीच्या नावाखाली वेगाने आणि बेजबाबदारपणे वाहने चालवत आहेत. काही ठिकाणी तर स्टंटबाजी करण्याचे प्रकारही समोर आले आहेत.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, अशा बेजबाबदार चालकांवर लक्ष ठेवले जाईल.
थाटे यांनी सांगितले की, ‘वाहतुकीचे नियम हे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहेत.सिग्नल तोडणे, वेगाने गाडी चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे किंवा स्टंटबाजी करणे हे कायद्याने गुन्हा आहे.
यापुढे जर कोणीही अशा नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर दंड आकारण्यासोबतच वाहन जप्त करणे आणि परवाना रद्द करण्याचीही कारवाई केली जाईल.
