बारामतीहून इंदापूरला जाणाऱ्या एसटीत एकावर कोयत्याने केला जीवघेणा हल्ला
1 min read
पुणे दि.१:- मागील काही दिवसांपासून पुण्यासह आसपासच्या परिसरात कोयता गँगने दहशत माजवल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच पुण्याच्या भवानी पेठेत कोयता गँगने राडा घातला होता. आम्ही इथले भाई, नादी लागायचं नाही, असं म्हणत टोळीने कोयत्याने हल्ला केला होता.
ही घटना ताजी असताना आता असाच काहीसा प्रकार बारामतीत घडला आहे.बारामतीवरून इंदापूरला जाणाऱ्या एसटी बसमध्ये एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. धावत्या बसमध्ये अशाप्रकारे हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसमध्ये हा हल्ला झाला, ती बस इंदापूर आगाराची होती.
घटनेच्या वेळी शुक्रवारी सकाळी ही बस बारामतीवरून इंदापूरच्या दिशेनं जात होती. ही बस काटेवाडी परिसरात आली असता,एका तरुणाने बाजुला बसलेल्या एका तरुणावर अचानक कोयत्याने वार केले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
हल्लेखोर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्याच कोयत्याने स्वत:वर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो स्वत:च्या गळ्यावर हल्ला करत होता, मात्र बसमधील काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत त्याला अडवलं. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
त्याने हा हल्ला नेमका कशामुळे केला? याची माहिती तूर्तास समोर आली नाही. पोलीस हल्ल्यामागच्या कारणाचा शोध घेत आहेत. ज्या तरुणावर हल्ला झाला होता, तो तरुण काटेवाडीमध्ये उतरून जखमी अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेला आहे. ज्याच्यावर हल्ला झाला तो तरुण नेमका कोण आहे? याचा तपासही पोलीस करत आहेत.
हा सगळा प्रकारमध्ये शेवटच्या सीटवर घडला आहे. हल्लेखोर आणि जखमी दोघंही एकमेकांच्या ओळखीचे असावेत, आपसातील वादातून हा हल्ला झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
