“६ जणांची हत्या कोणी केली?”, मालेगाव बॉम्बस्फोटीतील सर्व ७ आरोपींच्या सुटकेनंतर ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
1 min read
मुंबई दि.१:- महाराष्ट्रातील एक बहुप्रतिक्षित मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकून आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या निकालावर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुदद्दीन ओवैसी यांनी निराशा व्यक्त केली आहे.
तसेच त्यांनी एनआयए न्यायालयाने दिलेल्या निकालावर काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानच्या महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोटांची चौकशी सुरूवातीला एटीएसने केली होती,
त्यानंतर तो तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. यानंतर एनआयए कोर्टाने १७ वर्षांनंतर या प्रकरणात निर्णय दिला आहे. असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले आहेत?
ओवैसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पाच मुद्दे मांडले आहेत, ते पुढीलप्रमाणे –
१) मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल हा निराशाजनक आहे. या स्फोटात सहा नमाजी ठार झाले आणि जवळपास १०० जण जखमी झाले होते. त्यांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य करण्यात आले. जाणूनबुजून केलेला निकृष्ट तपास/खटला या निर्दोष मुक्ततेला जबाबदार आहे.
२) पुराव्याच्या अभावामुळे बॉम्बस्फोटाच्या १७ वर्षांनंतर न्यायालयाने सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले आहे. मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला स्थगिती देण्याची मागणी केली तेवढ्याच तत्परतेने मोदी आणि फडणवीस सरकार या निकालावर अपील करतील का? महाराष्ट्रातील ‘धर्मनिरपेक्ष’ राजकीय पक्ष जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करतील का? सहा लोकांची हत्या कोणी केली?
३) लक्षात ठेवा, २०१६ मध्ये या प्रकरणातील तात्कालीन वकील रोहिणी सालियन यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले होते की एनआयएने त्यांना आरोपींबद्दल मवाळ भूमिका घेण्यास सांगितले होते. लक्षात ठेवा, २०१७ मध्ये एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पुढे २०१९ मध्ये भाजपा खासदार बनल्या.
४) करकरे यांनी मालेगाव येथे झालेल्या कटाचा पर्दाफाश केला होता आणि दुर्दैवाने २६/११ च्या हल्ल्यात ते पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मारले गेले. भाजपा खासदाराने सार्वजनिकपणे म्हटले होते की त्यांनी करकरे यांना श्राप दिला होता आणि त्यांचा मृत्यू त्याच श्रापाचा परिणाम होता.
५) एनआयए/एटीएस अधिकाऱ्यांना निकृष्ट तपासासाठी जबाबदार धरले जाणार का? मला वाटते की आपल्याला याची उत्तरे माहिती आहेत. हे दहशतवादाच्या विरोधात कठोर असलेले मोदी सरकार आहे. जग लक्षात ठेवेल की यांनी एका दहशतवादाच्या आरोपीला खासदार बनवले.
