कोल्हापूरच्या सर्पमित्राला तब्बल ११ वेळा सर्पदंश, तरीही सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी आजवर हजारो सापांना दिलं जीवदान
1 min read
कोल्हापूर दि.३०:- कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या पोर्ले या गावात एक नाव विशेष सन्मानाने घेतलं जातं, ते म्हणजे सर्पमित्र दिनकर कृष्णा चौगुले. सापांविषयी असलेली भीती, अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करत गेली चार दशके त्यांनी सर्पसंवर्धन, संरक्षण आणि लोकजागृतीचं कार्य सातत्याने केलं आहे.
आज अनेकजण केवळ प्रसिद्धीसाठी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओसाठी सर्पमित्र म्हणून साप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र या मुक्या प्राण्यांना सुरक्षित ठेवण्याचे काम सुरू ठेवत चौगुले यांनी संपूर्ण आयुष्यच या कार्यासाठी समर्पित केलं आहे.
1977 साली दिनकर चौगुले यांनी पहिल्यांदा साप पकडला होता. यामागचं कारणही सामाजिकच होतं, त्यांना वारंवार गावात साप दिसल्यावर लोक त्याला निर्दयपणे दगडावर आपटून मारताना दिसायचे. त्याच दरम्यान त्यांना बत्तीस शिराळा भागात साप न मारता काठीच्या सहाय्याने पकडला जात असल्याचं समजलं.
त्यानंतर त्यांनी तिथे जाऊन आणि नंतर पुण्यात प्रशिक्षण घेत साप पकडण्याची योग्य पद्धत आत्मसात केली. यानंतर हे ज्ञान जनहितासाठी वापरण्याचा निर्धारच त्यांनी केला. आजवर दिनकर चौगुले यांनी हजारो सापांना सुरक्षितरित्या पकडून निसर्गात परत सोडलं आहे. या काळात अज्ञानामुळे पूर्वी त्यांना अकरा वेळा सर्पदंशही झाला,
तरीही त्यांनी आपलं कार्य थांबवलं नाही. “साप भीतीदायक नसून, निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे,” हे सांगण्यासाठी ते गावोगावी फिरत राहिले. 1983 मध्ये पुण्यातून योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सर्पमित्र घडवण्यासाठी शिबिरे घेतली. आजवर 100 हून अधिक तरुणांना त्यांनी प्रशिक्षित केलं आहे.
“साप सांभाळा, निसर्ग वाचा” या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी शाळा, संस्था आणि गावांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे.सर्पमित्र म्हणून चौगले यांची कामगिरी पाहून वनविभागाने त्यांना स्वतः नोकरीची ऑफर दिली. काही वर्षे त्यांनी वनविभागात सेवा दिल्यानंतर 1992 साली नोकरी सोडून त्यांनी प्राण्यांवर अभ्यास करत.
स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सध्या ते LED बोर्डचा व्यवसाय सांभाळत आहेत. सापांबरोबरच चौगुले यांनी वानर, बिबट्या, मधमाशी आणि इतर वन्य प्राण्यांचाही जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आजही ते कोणत्याही प्रसंगी मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी वेळकाळ न बघता धावून जातात.
त्यामुळे त्यांचं कार्य नवोदित सर्पमित्रांसाठी एक आदर्शच ठरत आहे. दरम्यान, सर्पांविषयी भीती, अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करणे ही आजची गरज आहे. कोणताही साप दिसल्यास प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घेणं हेच योग्य ठरतं.
“प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. निसर्गाचा समतोल राखणं ही आपली जबाबदारी आहे,” असं दिनकर चौगुले यांचं स्पष्ट मत आहे.
