वॉटर संस्थेच्या माध्यमातून दुष्काळी पठार भागाची पाणीदार पठार भाग म्हणून नवीन ओळख

1 min read

आणे दि.२५:- वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) ही सेवाभावी संस्था गेल्या ३१ वर्षापासून पाणलोट क्षेत्र विकासाद्वारे ग्रामीण विकासासाठी महाराष्ट्रासह भारतातील ९ राज्यांमध्ये कार्यरत असुन आतापर्यंत चार हजार गावांमध्ये काम करत आहे. वॉटर संस्था प्रामुख्याने मृद व जलसंधारण,शेती विकास,उपजीविका आधारित उपक्रम, महिला विकास,आरोग्य व पोषण या घटकावर काम करत आहे.गेले वर्षभरापासून संस्थेमार्फत आपल्या अणे पठार भागातील अणे,आनंदवाडी, पेमदरा,नळावणे,शिंदेवाडी गावाची डच बँक (Deutsche Bank ) च्या अर्थसहायातून जलसंसाधन विकास व व्यवथापन प्रकल्पाच्या अंतर्गत निवड करण्यात आली आहे. सदर प्रकल्प हा लोक सहभागावर आधारित आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने जलसंधारणाची कामे केली जातात. यामध्ये सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करणे,जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे ,जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण,जाळी बंधारे,कोरवाल बंधारे तसेच लाभार्थी गटाची स्थापना करणे, सूक्ष्म व तुषार पद्धतीचा अवलंब करणे, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे,प्रशिक्षण व मार्गदर्शन इत्यादी उपक्रम संस्थेमार्फत प्रकल्पामध्ये राबवण्यात येत आहेत. गेले वर्षभरापासून वॉटर संस्थेने अणे पठार भागावर काम करत असताना जलसंधारणाच्या दृष्टीने एक ठोस पाऊल उचलत आतापर्यंत १० सिमेंट बंधारे २ गाबियन बंधारे, १५ नाला,तलाव खोलीकरणाची कामे केली आहे. ही कामे करत असताना शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी १०० शेतकरी बांधवांना गांडुळखत बेड वाटप, ३० शेतकरी बांधवांना सेंद्रिय द्रावण बनविण्यासाठी बॅरल, चिकट सापळे,ठिबक सिंचन तुषार सिंचन वापरणाऱ्या ५० लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान अशी जवळपास एक ते दीड कोटी रुपयांची कामे अणे पठार भागावर झाली असून सद्यःस्थिती मध्ये देखील संस्थेच्या वतीने पठार भागावर विविध जलसंधारणाची कामे सुरू आहे. तसेच आनंदवाडी येथे वॉटर संस्था व यमाईमाता शेतकरी गटाच्या माध्यमातून सामूहिक गांडूळखत निर्मिती प्रकल्प तसेच अणे येथे सामूहिकटेन ड्रम थिअरी तंत्रज्ञान प्रकल्प प्रगतीपथावर आहे. सदर कामांच्या माध्यमातून दुष्काळी अणे पठार भागावरील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली असून त्याचा प्रत्यय चालू उन्हाळ्यात एप्रिल महिन्यापर्यंत अणे येथील बंधाऱ्यांमध्ये साठलेल्या पाण्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. भविष्याचा वेध घेऊन दुष्काळी अणे पठार भागावर वॉटर संस्थेने आगामी ५ वर्षाचा जलसंधारणाचा आराखडा तयार करून शाश्वत काम केले तर कायमस्वरूपी दुष्काळी समजला जाणारा पठार बाग हा पाणीदार,बागायती पठार भाग ओळखला जाईल अशी अपेक्षा पठारावरील शेतकऱ्यांनी केली असून वॉटर संस्थेला धन्यवाद दिले आहेत.

——-
प्रतिक्रिया

‘ माझ्या शेतातील गट क्र.६७२ मध्ये वॉटर संस्थेच्या माध्यमातून गेल्यावर्षी जो सिमेंट बंधारा निर्माण झाला.चालू वर्षी झालेल्या पावसाने सदर बंधारा पूर्णपणे भरला गेला आहे. सदर बंधाऱ्याने परिसरातील अनेक विहिरी तसेच बोअरवेल याची पाणी पातळी वाढली असून यावर्षी सदर पाणीसाठा एप्रिल मे पर्यंत राहील अशी अपेक्षा आहे.’

शरद दाते, शेतकरी आणे
——–
प्रतिक्रिया

‘ वॉटर संस्थेच्या सहकार्याने आगामी ५ वर्षात दुष्काळी पठार भाग पाणीदार करत असताना शेतकरी वर्गाला सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणार’

माऊली संभेराव, स्थानिक शेतकरी
——–
आणे पठार दुष्काळ ग्रस्त असून आमच्या पठारावरील पाणी आमच्याच शेतकऱ्याला वापरता येण्यासाठी वॉटर शेड मार्फत ग्रामपंचायतने सर्वे केला. त्या नुसार पठारावर अनेक बंधारे झाले आहेत. जवळपास दीड कोटी रुपयांची कामे अणे पठार भागावर झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. पठारावरील शेतकऱ्यांना पाणीदार करण्याचा आमचा संकल्प वॉटर शेड च्या माध्यमातून पूर्ण होत आहे.

प्रियांका दाते,
सरपंच आणे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!