लम्पी चर्मरोग प्रतिबंध उपाययोजना राबवा:- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
1 min read
पुणे दि.२५:- जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहीम तसेच रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग या विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून.
आल्याने या रोगाचे नियंत्रण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जिल्ह्यातील सर्व सहायक आयुक्त व तालुक्याचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाने जनावरे आजारी असल्याने आजअखेर ९०६ जनावरांना या रोगाची बाधा झालेली आहे. यापैकी औषधोपचाराने ५९१ जनावरे बरी झाली असून, १५ जनावरे मयत झाली आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये ३०० जनावरांवर उपचार सुरू असून,
दिवसेंदिवस रोगाचा प्रसार होऊन यामध्ये वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नरमध्ये सर्वाधिक जनावरांना लम्पी चर्मरोग विषाणूची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी संसर्ग केंद्राच्या पाच किलोमीटर परिसरामध्ये लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पशुपालकांनी लम्पी चर्मरोगबाधित पशुधनास उपचार करण्यासाठी १९६२ या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले. तर, या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.
असे गेल्या दोन वर्षांत निदर्शनास आले असून त्या दृष्टीने सर्वांनी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.डॉ. अंकुश परिहार म्हणाले, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बाधित गाव व बाधित गावालगतच्या पाच किलोमीटर परिसरातील गोवर्गीय पशुधनास प्रतिबंधात्मक लसीकरण गोट पॉक्स लसीद्वारे (उत्तरकाशी स्ट्रेन) करण्यात येते.
पुणे जिल्ह्यामध्ये २०व्या पशुगणनेनुसार ८,४६,७४५ इतके गोवर्गीय पशुधन असून, चालू वर्षी सन २०२५-२६ मध्ये एकूण ५,८०,६०० लस मात्रा वितरित केल्या असून ५,७०,७९१ इतके लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी रोगाचा उद्रेक दिसून येत आहे, त्यासाठी तालुकानिहाय लस मागणी घेण्यात आली असून नव्याने लसमात्रा खरेदी करून पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
