कर्नाटकी कांद्यामुळे दक्षिणेतील मागणी घटली
नाशिक दि.१८: – दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थानिक कांद्याचे उत्पादन आल्याने परिणामी मागणी कमी झाली, तसेच दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्येही कांद्याची आवक वाढल्याने मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात धोरणात सातत्य ठेवून निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे.कर्नाटकमधून कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळसारख्या दक्षिणेकडील राज्यांत स्थानिक पुरवठा वाढला आहे. परिणामी, हक्काची बाजारपेठ असलेल्या या राज्यात महाराष्ट्रातील कांद्याला ब्रेक लागला आहे.
यावर्षीच्या उन्हाळी कांद्याच्या हंगामाला अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, साठवणूक केलेला कांदाही नैसर्गिक आर्द्रतेमुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यावर्षी रबी हंगामात देशभरात कांद्याचे उत्पादन अधिक झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये साठा वाढला आहे.
त्याचा थेट परिणाम म्हणून सध्या बाजारात केवळ १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी उन्हाळी कांद्याला किमान ६००, कमाल २, ११२ रुपये, तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मिळालेल्या या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
