श्री विघ्नहर तज्ञ संचालक विकास चव्हाण यांचा भीमाशंकर साखर कारखान्याकडून गौरव

1 min read

जुन्नर दि.१९:- पारगाव तर्फे आळे येथील युवा ऊस अभ्यासक आणि ऊस भूषण पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते, तसेच ५० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित झालेले विकास हरिभाऊ चव्हाण यांची नुकतीच श्री विघ्नहर सहकारी साखर लि कारखाना जुन्नर/आंबेगाव, येथील तज्ञ संचालक पदी निवड झाली.कृषी पदवीधर असलेले चव्हाण यांनी ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढ आणि खर्च कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी पद्धतीने कार्य केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या ऊस खोडवा व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन चळवळी, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, पाणी व जमिनीच्या सुपीकते संदर्भातील उपक्रम यामुळे राज्यभरातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे.चव्हाण यांनी अनेक शेतकरी मेळावे व प्रात्यक्षिकं स्वतःच्या शेतात आयोजित करत ऊस शेतीतील सुधारित तंत्रज्ञान प्रचारित केले आहे. त्यांचे एकरी १२६ मेट्रिक टन ऊस उत्पादन व खोडवा एकरी ११० मेट्रिक टन असा उच्च रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, “विघ्नहरला खऱ्या अर्थाने एक तज्ञ संचालक मिळाला,”असे मत अनेक कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.या उल्लेखनीय निवडीचा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी विशेष गौरव केला. त्यांनी चव्हाण यांना सस्नेह आमंत्रण देत सन्मानचिन्ह आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित कृषी पुस्तक देऊन सन्मानित केले.प्रदीप दादांनी ऊस उत्पादन वाढीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करताना,“विकास तुम्ही जर भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असता, तर नक्कीच तुम्हाला आमचाही तज्ञ संचालक बनवलं असतं,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. विघ्नहर आणि भीमाशंकर या शेजारील दोन प्रमुख साखर कारखान्यांमधील हे स्नेहबंध व परस्पर सन्मानाचे उदाहरण ऊस क्षेत्रात प्रेरणादायी ठरणारे आहे.विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि संचालक मंडळ यांनी दूरदृष्टी ठेवून विकास चव्हाण यांची केलेली निवड ही तज्ञतेची आणि शेतकरीहिताची पोचपावती मानली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!