शेत जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणात अकरा वर्षांपूर्वी मारहाण; तिघांना २ वर्षांची शिक्षा
1 min read
जुन्नर दि.१८:-हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे ११ वर्षांपूर्वी शेत जमिनीच्या वादातून मारहाण प्रकरणात तिघा आरोपींना जुन्नर न्यायालयाने प्रत्येकी २ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ६ महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. ही माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
दशरथ गणपत भोर (वय ५५), अमोल ऊर्फ पप्पू दशरथ भोर (वय २५) आणि विठ्ठल गणपत भोर (वय ५०) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना दि. ६ मे २०११ रोजी हिवरे तर्फे नारायणगाव गावच्या हद्दीत घडली. फिर्यादी विश्वास शंकर भोर यांच्या शेतात (गट नं. ४२६/१) जेसीबीच्या साहाय्याने लेव्हल करण्याचे काम सुरू होते.
या वेळी तेथे दशरथ, अमोल आणि विठ्ठल भोर या तिघांनी एकत्र येत विश्वास व त्यांच्या मुलास शिवीगाळ,दमदाटी केली. ‘शेताच्या साइडला लेव्हलिंग का करता?’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी तसेच हातातील काठ्यांनी मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन सहाय्यक फौजदार एन. के. मोहरे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दि. १४ जुलै २०२५ रोजी जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश ए. एच. बाजड यांनी या तिघा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून एम. एस. घोडके यांनी काम पाहिले.
न्यायालयीन कामकाज सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, महिला पोलिस शिपाई ललिता किर्वे यांनी पाहिले. जिल्हा न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शशिकांत खरात, महिला पोलिस हवालदार एम. एम. ताम्हाणे यांनी काम पाहिले.
