शिरूरच्या गुन्हे शोध पथकाने केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; तिघे ताब्यात
1 min read
शिरूर दि.१८: -शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट पोलिसी तपास करीत ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या आंतरराज्य सराईत टोळीचा पर्दाफाश केला. टोळीने एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली असून ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
टोळीतील तिघे गजाआड झाल्याने शिरूर तालुक्यासह जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचा शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.लवकुश कुमार ऊर्फ रामप्रसाद गौतम (२२, रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), मोहम्मद फरान खान ऊर्फ साहील (२१, रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश),
मुजाहिर सौकत अली खान (२२, रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांसह शिरूर परिसरात ९ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. (दि.४) जुलै रोजी आंबळे येथील गट नंबर ५७९ मधील १००/२२ केव्ही क्षमतेच्या रोहित्रातील ऑइल काढून
५० किलो तांब्याची कॉइल चोरली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यातील रोहित्र चोरीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे नागरिक, शेतकरी, उद्योजक त्रस्त झाले होते. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
शुभम चव्हाण यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. त्यांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, माहितीच्या आधारे ही टोळी चिखली (पुणे) येथे असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ सापळा रचून गाडी ताब्यात घेतली.
गाडीतून तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी ३१५ किलो तांब्याच्या कॉईल, चारचाकी गाडी, अशी ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
