‘युनेस्को’च्या यादीत महाराष्ट्रातील अकरा गड-कोट

1 min read

पॅरिस दि.१२:- आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रयतेला आणि मनांना मुक्त करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत झाला आहे. ‘युनेस्को’च्या २०२४-२५ या वर्षीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी भारत सरकारने ‘भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले’ या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित या किल्ल्यांची शिफारस केली होती. भारतीय शिष्टमंडळाने पॅरिसमध्ये ‘युनेस्को’च्या समितीसमोर सादरीकरण करताना या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा पटवून दिला. त्यानंतर समितीने ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून या किल्ल्यांना मान्यता दिली. शिवकालीन दुर्गाचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.भारत सरकारने महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खदिरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांबरोबरच तमिळनाडूमधील जिंजी अशा मराठा साम्राज्यातील बारा किल्ल्यांची शिफारस ‘युनेस्को’ कडे केली होती. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे. स्वराज्यातील प्रशासकीय केंद्रे म्हणून काम करण्याबरोबरच शत्रूसैन्यावर वचक ठेवण्याचे कामही या किल्ल्यांनी केले होते. द्रष्टा राज्यकर्ता म्हणून जगभरात गौरविल्या गेलेल्या छत्रपती शिवरायांनी अत्यंत धोरणीपणाने या किल्ल्यांचा वापर करत स्वराज्याची बांधणी आणि रक्षण केले होते. या किल्ल्यांची धास्ती इंग्रजांच्या काळापर्यंत टिकून होती.

प्रतिक्रिया
“स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेवैभव उभारले, शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यांत दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे. देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.”

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!