लोणावळ्याजवळ मालगाडी रूळावरून घसरली
1 min read
लोणावळा दि.१२:- शुक्रवार दि.११ रोजी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळ्याजवळ मालगाडीचा डब्बा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे चेन्नई एक्सप्रेस, जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, दिल्ली जयपूर एक्सप्रेस गाड्या रखडल्या होत्या. तर इतर ट्रेन दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत आणि लोणावळ्याच्या दरम्यान मालगाडीचा डब्बा घसरला.यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले. घसरलेला रेल्वे डब्बा लवकर रुळावर आणण्यात येईल आणि वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गाने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अनेक जण मुंबई-पुणे असा नियमित प्रवास करतात. अनेक जण कामानिमित्ताने दररोज असा प्रवास करतात. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांनादेखील याचा मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून सध्या वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
