व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल दिंडी सोहळ्यात भक्तिभाव आणि संस्कृतीचा संगम
1 min read
वडगाव कांदळी दि.७:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडी सोहळा भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळा परिसरात टाळ-मृदुंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या अभंगात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व परिचयाने झाली. यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची पूजा व आरती विधिपूर्वक पार पडली. विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या संतांच्या पालख्या, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती आणि पारंपरिक वेषातील विद्यार्थ्यांची रांगोळीने सजवलेली मिरवणूक म्हणजे एक अद्भुत भक्तिपर्व ठरले.
1 ली ते 10 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या दिंडीत सहभाग घेतला.यानंतर मंचावरील कार्यक्रमांची सुरुवात झाली. यात पालखी पूजन, लेझीम, भजन, सांस्कृतिक नृत्य, गाणे, तसेच कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचे समर्पक आणि मनोहारी सूत्रसंचालन पूनम राऊत व शीतल काळे यांनी केले.
तसेच शाळेचे शिक्षक रुपेश पाचपुते यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त विक्रांत काळे यांचीही कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभली.शाळेतील आषाढी एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त कलाशिक्षक रोशन बनकर यांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली.
सुंदर रंगसंगती, बारकाव्यांची अचूक मांडणी आणि भावपूर्ण फलक लेखनामुळे कार्यक्रम अधिकच भक्तिमय झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम अधिक प्रभावी आणि अनुशासितरित्या पार पडला. तसेच शाळेच्या समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचेही यासाठी मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना तयारीपासून मार्गदर्शनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदतीचा हात दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमधून त्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव प्रकर्षाने दिसून आली.
या भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रमास विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि सन्माननीय सीईओ दुष्यंत गायकवाड यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच शाळेत असे सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, अध्यात्मिक मूल्यांची ओळख आणि सामूहिकता यांचे शिक्षण जोपासले गेले, हे विशेष.
