मंचर ते श्रीक्षेत्र भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा; आमदार वळसे पाटील यांचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना पत्र
1 min read
मंचर दि.३:- मंचर ते श्रीक्षेत्र भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याबाबत माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून रस्ता दुरुस्तीची तातडीने मागणी बुधवारी (दि.२) केली आहे.
भीमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने या ठिकाणी सातत्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सतत असणारी वाहणांची वर्दळ आणि त्यात धो धो पाऊस यामुळे भीमाशंकर रस्ता हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र, असे असले तरी दरवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग हा लगेचच हे खड्डे बुजवण्याचे काम करत असतो.
यावेळी मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडून सुद्धा खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, नेहमी बुजवले जाणारे खड्डे यावेळी का बुजवले जातं नाहीत.या कारणाचा विचार केला असता असे निदर्शनास आले की मंचर भीमाशंकर रस्ता हा पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता.
मात्र, तो आता राष्ट्रीय महामार्ग होणार असून त्यासाठी जमिनीचे संपादन देखील सुरू झाले आहे. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकामकडून वर्ग करून सध्या तो केंद्रीय रस्ते व परिवहन विभागाच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर खर्च करण्याचा अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला विभागाला राहिला नाही.
त्यामुळे हा विषय माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी दि. २८ जून २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या समोर मांडून त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती.मात्र, जिल्हाधिकारी यांनी देखील रस्ता हा केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडे वर्ग झाल्याचे सांगत काम कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केला होता.
या सगळ्याचा विचार करून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या विषयी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, रस्ते आणि परिवार विभागाचे मुख्य अभियंता व विभागीय अधिकारी यांना पत्र देऊन तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे लवकरच रस्ता दुरुस्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
