ढाब्यावर जेवण करून घरी परतताना कारचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार तर दोन गंभीर
1 min read
छ. संभाजीनगर दि.२५:- छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. पाच मित्र धाब्यावरुन जेवण करून छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना भरधाव कार रस्त्यावरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.हा अपघात छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्ग बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील पाच जण फुलंब्री रस्त्यावरील ढाब्यावर कारने जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगर – जळगाव राष्ट्रीय महामार्गावरुन ते येत होते.
भरधाव वेगात असलेली चारचाकी बिल्डा फाट्याजवळ आली. यावेळी कारचालकाला रस्त्यावरील पुलाचा अंदाज न आल्याने कार थेट पुलाच्या दुभाजकाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होतं की कार रस्त्यात उलटली. दरम्यान या भीषण अपघाताची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना मिळाली.
पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे घटी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. मृताच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये टाहो फोडला.
