पिंपरी पेंढार येथे भरदुपारी चोरी; लाखोंचे दागिने लंपास

1 min read

आळेफाटा दि.२५:- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावच्या हद्दीतील गटवाडी येथील अमित कुटे यांच्या घरात भरदिवसा चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील साडे सहा तोळे वजनाचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि. २४) दुपारी दोनच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच ओतूर ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप मोरे तातडीने घटनास्थळी गेले.पिंपरी पेंढार येथील गटवाडीमध्ये अमित कुटे आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत राहतात. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची आई पावसाने उगवलेले गवत काढीत होती. या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी दोघांनी घरात प्रवेश केला.गटवाडी येथे चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले.एकजण पाळतीला उभा राहिला. दोघांनी घरातील दोन्ही कपाटे उचकटून त्यातील साडेसहा तोळे वजनाचे दागिने व एक हजार रुपये लंपास केले.दरम्यान, कुटे यांच्या घरोसमोरील निखिल मस्करे याला तिघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याने कुटे यांच्या आईला तुमच्याकडे कोण पाहुणे आले होते का? असे विचारले.त्या नाही म्हणाल्यानंतर त्यांनी घरात येऊन पाहिले असता, कपाटातील साडेसहा तोळे दागिने गायब झाल्याचे दिसले.घटनेची माहिती मस्करे यांनी ओतूर पोलिसांना दिली. याबाबतची फिर्याद रत्ना कुटे यांनी दिली आहे. अमित कुटे व त्यांच्या पत्नी रत्ना कुटे दोघेही दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. चोरट्यांनी रेकी करून घरातील दागिन्यांवर डल्ला मारला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!