आणे पठार शेतकऱ्यांचं रखरखत्या उन्हात येडगाव धरणाजवळ ठिय्या आंदोलन; २५० किलोमिटर पाणी जाते आम्हाला का नाही? शेतकरी आक्रमक

1 min read

नारायणगाव दिनांक २३:- जुन्नर तालुक्यातील आणे पठारावरील आणे, आनंदवाडी, पेमदरा, शिंदेवाडी, व्हरूंडी, नळवणे या अवर्षणग्रस्त गावांना उपसासिंचनद्वारे पाणी मिळावे, मंजुरी मिळालेल्या वडज उजव्या कालव्याचे काम पूर्ण करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना, आणे पठार विकास संस्था, किसान संघ यांच्या वतीने येडगाव धरण जलाशयाजवळ ठिय्या आंदोलन केले. या वेळी महिला शेतकरी आक्रमक झाल्या होत्या.

यावेळी प्रियांका दाते, अर्चना उबाळे व बाळासाहेब दाते म्हणाले, “जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे पाणी २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांना जाते. मात्र, कुकडी प्रकल्पापासून ३५ किलोमीटर असलेल्या अवर्षणग्रस्त आणे पठारावरील गावांना मिळत नाही. कुकडीच्या पाण्यासाठी मागील चाळीस वर्षे आम्ही संघर्ष करत
आहोत. उघडे डोंगर व कोरड्या विहीरी पाहून आमची एक पिढी गेली आहे. निवडणुकीत फक्त आश्वासन दिले जाते. मात्र, त्यानंतर कार्यवाही होत नाही. याबाबत निर्णय न झाल्यास पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. तीव्र स्वरूपात आंदोलने करण्यात येतील.”

“कुकडी प्रकल्प तालुक्यात असूनही आणे पठार, बस्ती सावरगाव परिसरातील व तालुक्यातील सोळा गावांतील सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. या गावांना पाणी मिळण्यासाठी सर्व्हे करून कुकडी प्रकल्प पाणीवाटपाचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक आहे. संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसमवेत २५ मे रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठक होणार आहे. हा प्रश्न सुटला नाही तर या पुढील आंदोलनात मी शेतकऱ्यांसोबत राहणार आहे.”

अतुल बेनके, आमदार

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे, तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, अजित वाघ, युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे, किसान संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता खोमणे, उपसरपंच बाळासाहेब दाते, तुषार आहेर, सरपंच (आणे ) प्रियांका दाते, सरपंच (नळावणे) अर्चना उबाळे, अशोक दाते, बाबाजी शिंदे, प्रशांत दाते, तुषार देशमुख यांच्यासह आणे पठारावरील विविध गावचे शेतकरी उपस्थित होते. ठिय्या आंदोलनात महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटेही उपस्थित होते.

सोमवारी सायंकाळी चार वाजता आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या वेळी बेनके व बुचके यांनी मोबाईलद्वारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी २५ मे रोजी या संदर्भात पुणे येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ठिय्या आंदोलन स्थगित केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे