आणे पठारावरील शेतकऱ्यांचं येडगाव धरणावर उद्या भव्य आंदोलन; ४ ग्रामपंचायतींचा मतदानावर बहिष्कार
1 min read
आणे दि.२१:- आणे पठारावरील शेतकऱ्यांचं येडगाव धरणावर उद्या सोमवार दि.२२ भव्य अस ठिय्या आंदोलन असून पठारावरील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी पेटून उठले आहेत.आंदोलनाची सर्व तयारी झाली असून आंदोलनासाठी पठारभागावरील शेतकरी बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पठार विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले.तर आणे पठारच्या चारही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
आणे पठारावरील सर्व ग्रामपंचायतींनी २००६ पासून वेळोवळी ग्रामसभेचे ठराव घेवून या भागासाठी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी सातत्याने केली आहे.कुकडी प्रकल्पाची दुसरी सु.प्र.मा.1993 मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाण्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगत 2018 मध्ये कुकडी प्रकल्पात पाणीच शिल्लक नाही असे मोघम उत्तर देत तिसऱ्या सु.प्र.मा.च्या दिशेने पाऊले टाकीत असताना तहानलेल्या आणेपठारची मात्र कायमच उपेक्षा केली जात होती.
2018 च्या दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर स्व.घमाजीशेठ शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेल्या आणेपठार विकास संस्थेने जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 2023 मध्ये कुकडीच्या चौथ्या सु.प्र.मा.त आणे पठारचा समावेश व्हावा यासाठी पठारवासियांनी मतदानावर बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले.
आमच्या आणे पठाराचा कुकडी प्रकल्पात समावेश करून सर्वेक्षणाचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी पठारभागाच्या वतीने कुलस्वामी खंडेराया ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी केली.जलसंपदा खात्याने कुकडीचे पाणी उपसासिंचनाने पठारावर आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व यासाठी हरितऊर्जा प्रकल्पांच्या उभारणी करण्यात यावी अशी मागणी भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते यांनी केली.
उपसासिंचनाने पाणी उपलब्ध करून दिल्यास आणे पठारावरील सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येवून तरुणांच्या हाती रोजगार येईल तसेच केंद्र शासनाच्या नैसर्गिक शेती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होऊन विषमुक्त शेतमाल या पठारावर पिकविला जाईल. काळ्याआईची सेवा करणाऱ्या बळीराजाच्या दारात खऱ्या अर्थाने सुखसमृद्धी येईल, असं आमच्या मागच्या पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येईल, अशा भावना शिंदेवाडी गावचे तरूण सरपंच अजित शिंदे यांनी व्यक्त केल्या.
आणे पठारावरील नळवणे-शिंदेवाडी-पेमदरा-आणे ग्रामस्थांनी आपल्या एकजूटीतून संविधानाने दिलेला हक्क नाकारत प्रशासनाला जाग आणण्यासाठी उद्या पासून कुकडी नदीवरील येडगाव धरणावर ठिय्या आंदोलनास सर्व पक्षीय नेते मंडळांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आणेपठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते यांनी केले.