आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते आणे पठारावरील तलावांच्या गाळ काढणीचा शुभारंभ
1 min read
आणे दि.२१:- आणे व शिंदेवाडी (ता: जुन्नर) येथील आठ तलावांच्या गाळ काढणीला ची सुरुवात आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते झाली.आणे येथील सुतारठीके पाझर तलाव, कोंडगा पाझर तलाव, संभेराव वस्ती जवळील आर्वळवेंद पाझर तलाव,आनंदवाडी जवळील इनामदार वस्ती नाला बंधारा तर शिंदेवाडी येथील धनगर वेंद तलाव, इटकाई मळा येथील तास ओहळ पाझर तलाव, कपूरवाडीतील अंबुडोह पाझर तलाव,शिंदेमळा येथील जांबाचा डोह पाझर तलाव अशा आठ तलावांच्या गाळप काढणीचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने मृद व जलसंधारण विभाग यांचेमार्फत तीन वर्षासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अशा योजनेतून पाझर तलावातील सुपीक गाळ काढून शेतकऱ्याच्या शेतात टाकून शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे व जल संस्थेच्या साठ्यात वाढ करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असणारे गाव शिंदेवाडी व आणे तालुका जुन्नर या ठिकाणी आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते सदरच्या कार्यक्रमाचा शनिवार (दि.२०) शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असून शेतकरी स्वतःच्या वाहनाने आपापल्या शेतात गाळ वाहतूक करण्यासाठी उत्सुक आहेत.सदरच्या कार्यक्रमासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून मॉडेल ॲक्शन फॉर रुरल चेंज,पुणे या स्वयंसेवी संस्थेची निवड ग्रामपंचायत शिंदेवाडी व आणे यांनी केलेली असून शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरणारी असून पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन शेती सिंचनसाठी उपयुक्त आहे.
या वेळी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, जलसंधारण उपविभागीय अधिकारी चव्हाण,आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते,शिंदेवाडी गावचे सरपंच अजित दाते, माजी सरपंच एम डी.पाटील शिंदे, उपसरंच सुहास आहेर,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, खंडू बेलकर,गोरख शिंदे,संतोष आहेर,अजित आहेर, सुनिता दाते, ज्ञानेश्वर संभेराव व ग्रामस्थ उपस्थित होते.