मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलावरून टँकर थेट खाडीत पडला; चालकाचा मृत्यू

1 min read

मुंबई दि.२४:- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलावर टँकर खाडीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे. टॅंकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिल्यानंतर स्टेअरिंग वळवताना टॅंकर लोखंडी ग्रीलच्या कठड्याला धडकला आणि कठडा तोडून टँकर थेट खाडीत कोसळला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पूलावर सोमवारी बाराच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे.टॅंकर पूर्णपणे खाडीच्या पाण्यात बुडाल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. टॅंकर ठाण्याकडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर नायगाव आणि भाईंदरला जोडणाऱ्या जुन्या वर्सोवा पुलावर हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून टँकर मात्र खाडीच्या पात्रात बुडाला आहे.पाण्याच्या टँकरवरील नियंत्रण सुटल्याने तो वर्सोवा खाडीत (भाईंदर खाडी) पडला. टँकर ठाण्याकडे जात असताना रेलिंग तोडून तो खाडीत पडला, असे काशीगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले. चालकाकडे कोणतेही ओळखपत्र आढळले नाही. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही आणि टँकर खाडीत असल्याने अद्याप नंबर प्लेट सापडलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि या अपघाताचे कारण तपासत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!