२५ वर्षांनी संपन्न झाला पंडित नेहरू विद्यालयाचे माजी विद्यार्थी एकत्र
1 min read
निमगाव सावा दि.२७:- पंडित नेहरू विद्यालय, निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील सन १९९८-९९ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच द सिल्क रूट रिसॉर्ट, पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे येथे देवेंद्र गांधी यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात पार पडला असे सर्व विद्यार्थी मित्रांनी सांगितले. २५ वर्षांनंतर पुन्हा भेट झाल्याने मागे वळून पाहताना आठवणींनी डोळे पाणावले व ओठांवर हसूही आले. याप्रसंगी दिवंगत शिक्षकवृंद व सहकारी मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या स्नेहमेळाव्यासाठी त्या काळातील सर्व मार्गदर्शक शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते.
याप्रसंगी तत्कालीन प्राचार्य विश्वनाथ आहेर, नरेंद्र नारखेडे, गुलाब गागरे, दादाभाऊ तांबे, पोपट दाते, कुंडलिक नढे, बुजाबा सातपुते, शिवाजी थोरात व संगीता थोरात तसेच श्रीपाद घाटपांडे व सुभाष बोरा इ. शिक्षकवृंदांची उपस्थिती होती. गुरु शिष्याच्या नात्याची ऊब पुन्हा एकदा अनुभवायास मिळाली.
सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन व फेटे बांधून चरणावर गुलाब पाकळ्यांची उधळण करत स्वागत करण्यात आले. प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र गांधी यांनी केले, तर अध्यक्षस्थान प्राचार्य विश्वनाथ आहेर यांनी भूषविले.
माजी विद्यार्थी देवेंद्र गांधी यांनी सर्व शिक्षक व सहकारी मित्रांना थर्मास पाण्याची बॉटल, मनी प्लांट भेट देऊन प्लास्टिकच्या बाटल्या न वापरणे व वृक्षारोपण करणे असा पर्यावरण पूरक संदेशही दिला…कार्यक्रमात मंदा पवार, चंद्रकांत चिखले, शरद आतकरी, निजाम पटेल, मंगल गाडगे, संदीप निलक,
विजय खाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. जुने मित्र, जुने शिक्षक, जुन्या आठवणी असा त्रिवेणी संगम याप्रसंगी दिसून आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेर सरांनी मनोगतात विद्यार्थ्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आणि जुन्या आठवणींचे सुरेख वर्णन करत शाळा सोडली होती पण शाळा मनातून गेली नसल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रशाली गागरे, रूपाली भालेराव व मनोज बेल्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन-आयोजन हे सर्व विद्यार्थ्यांच्या सहयोगाने अतिशय उत्कृष्टपणे पार पडले. एकमेकांच्या सहकार्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी आपसात आभारही मानले.
कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गुरुवर्यांनी सुंदर आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी देवेंद्र गांधी यांनी आभार मानत आयुष्याच्या वेगवान प्रवासात थांबून त्या सोनेरी काळाला उजाळा देणारा हा स्नेह मेळावा एक अमूल्य ठेवा असल्याचे सांगितले.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांची गळाभेट घेत डोळ्यात आनंदाश्रूने एकमेकांना निरोप दिला व लवकरच पुन्हा भेटू अशी आशा व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता आनंदमयी वातावरणात संपन्न झाली.