अवैध धंदे बंद करून दाखवा आणि १ लाख बक्षीस मिळवा; अधिकाऱ्यांना खुले आव्हान
1 min read
बारामती दि. १५:- बारामती तालुक्यातील ९९ गावे आणि १ नगरपालिका हद्दीमध्ये बेकायदेशीर व्यवसाय बंद असल्याची १२ गावे दाखवावीत आणि १ लाख १ हजार रुपयांचे बक्षीस मिळवावे, असे खुले आव्हान बारामती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवसे यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, बारामतीच्या खासदार, पुणे जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पुणे, बारामती प्रांताधिकारी यांना पत्राद्वारे केले आहे.अवैध धंदे बंद करण्यासाठी वारंवार चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र, व्यवसायावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात कारवाई होते. विसर पडताच पुन्हा हे बेकायदा व्यवसाय जोमाने सुरू होतात. हे व्यवसाय कोणाच्या पाठिंब्याने सुरू होतात, याची चौकशी झाली पाहिजे.
यासाठीच आता आम्ही थेट मुख्यमंत्री यांना दि. २५ एप्रिल रोजी पत्रव्यवहार करून बारामती शहर आणि तालुक्यातील ९९ गावे आणि १ नगरपालिका हद्दीतील १२ गावे बेकायदेशीर व्यवसाय बंद असल्याचे दाखवा आणि एक लाख एक हजाराचे बक्षीस मिळवा, असे खुले आव्हान केले आहे.सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवसे, जगदीश देवकाते, रमेश मोरे, संतोष आटोळे, गणेश महिला बचत गटाच्या अध्यक्षा शोभा घनवट, गजलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा पूनम नेवसे यांनी पत्रव्यवहार केला आहे. बारामती तालुक्यात हे व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावेत हे व्यवसाय बंद न झाल्यास सर्व तालुक्यातील महिला व नागरिक उपोषण करणार असल्याचा इशारा या सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
बारामती तालुक्यात बेकायदेशीर केमिकलयुक्त विषारी ताडी, हातभट्टी व विदेशी बनावट दारू मोठ्या प्रमाणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने राजरोस आणि खुलेआम सुरू आहेत. विषारी ताडी आणि दारूचे सेवन करून आत्तापर्यंत हजारो तरुणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.