गोव्यातील श्री लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी; ६ जणांचा मृत्यू; ३० जण जखमी
1 min read
पणजी दि.३:- गोव्यातील शिरगांव येथील यात्रेत चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली आहे. श्री लैराई देवी मंदिरात शुक्रवारी रात्री श्री लैराई यात्रेदरम्यान गर्दी अचानक नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर गोवा मेडिकल कॉलेज आणि मापुसा येथील नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिरगांवमध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर गोवा सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि बिचोलीम रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
शिरगांवमध्ये शुक्रवारपासून यात्रेला सुरूवात झाली होती. त्याच दिवशी दुर्घटना घडल्यामुळे गोव्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने अद्याप चेंगराचेंगरीच्या कारणांबाबत किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या ओळखीबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.शिरगांव येथील श्री लैराई देवी मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने भाविक जमतात.
धार्मिक उत्सवात गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक सहभागी होतात. यात्रेचा मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे ‘धोंडाची जत्रा’, ज्यामध्ये हजारो भाविक जळत्या निखाऱ्यांवरून चालतात. या पारंपरिक विधी दरम्यानच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी बचावकार्य करण्यात आलेय. दुर्घटनेतील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. या घटनेमुळे जत्रेतील उत्साहावर विरजण पडले असून भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.