बिहारच्या ८ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक
1 min read
राहाता दि.२:- कोपरगाव शहरातील घडाळ्याच्या दुकानातील चोरी प्रकरणी बिहार राज्यातील ८ जणांच्या टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असुन आरोपींकडून ९ लाख ८१ हजार रूपयांचे टायटन, रागा टायटन, टायमॅक्स कंपनीचे १० घड्याळे, दोन वायफाय राऊटर, ७ मोबाईल असा एकुण १० लाख ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली कबुली दिली आहे. आरोपींना आज गुरुवारी कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुरेंदर जयमंगल दास (वय ४०), रियाज नईम अन्सारी (वय ४०), पप्पु बिंदा गोस्वामी (वय ४४), राजकुमार चंदन साह (वय २०), राजुकुमार बिरा प्रसाद (वय ४५), नईम मुन्ना देवान (वय ३०), राहुलकुमार किशोरी प्रसाद (वय २६), गुलशनकुमार ब्रम्हानंद प्रसाद (वय २५ सर्व रा. घोडासहन ता.घोडासहन जि.मोतीहारी, राज्य बिहार) असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.
कोपरगाव शहरात सचिन वॉच कंपनी घड्याळाच्या दुकानाचे १८ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घड्याळे चोरून नेले होते. याबाबत संजय लालचंद जैन ( रा.गुरूद्वारा रोड, कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात
अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असतांना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास याच्यासह त्याच्या इतर ७ साथीदारांनी केला असून ते शिरूर (जि.पुणे) परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने शिरूर (जि.पुणे) येथे संशयितांचा शोध घेऊन सुरेंद्र दास सह त्यांच्या साथिदारांना ताब्यात घेतले.या आरोपींकडून १० लाख ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथिल दुकान फोडून घड्याळांची चोरी केल्याचेही कबुली त्यांनी दिली.
आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाणे करीत आहेत.या गुन्हाचा तपास पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात,
अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमिजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांच्या पथकाने केला.