लाचखोर ग्रामसेविका ६० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

1 min read

रांजणगाव गणपती दि. ३०:- भांबर्डे (ता. शिरूर) येथे गावातील पेव्हिंग ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणून दहा हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून पन्नास हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये लाच मागत ती रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याप्रकरणी महिला ग्रामसेविका निर्मला कैलास भुजबळ (वय ४४) यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.शिरुर तालुक्यातील भांबर्डे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणार्या निर्मला कैलास भुजबळ (वय ४४) पंचासमक्ष ६० हजारांची रोख रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांनी सन २०२०-२०२१ मध्ये ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेव्हिंग ब्लॉक बसवले असून, त्या कामाच्या बिलाचा मोबदला तसेच त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीचे केलेल्या बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या सहा टक्के अथवा ६० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी २७ मार्च २०२५ रोजी पुणे येथील लालुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. १ व ३ एप्रिल तसेच १५ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता.लोकसेवक निर्मला भुजबळ यांनी वरील नमूद कामासाठी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या सहा टक्के अथवा ६० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.२८ एप्रिल रोजी लाचलुचपत विभागाच्या सापळा कारवाईमध्ये लोकसेवक निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेव्हिंग ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणून १० हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून ५० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये लाचेची रक्कम भांबर्डे ग्रामपंचायत कार्यालय येथे पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे