कोलकत्यात हॉटेलला भीषण आग; 14 जणांचा होरपळून मृत्यू
1 min read
कोलकत्ता दि.३०:- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. हॉटेलमध्ये मदत आणि बचावकार्य सुरू आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य कोलकाता येथील फलापट्टी मच्छुआजवळ घडली. पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात आली असून बचाव कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकातामधील ऋतुराज हॉटेलला मंगळवारी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास ही आग लागली.
मदत आणि बचाव कार्यादरम्यान हॉटेलमधून 14 जणांचे मृतदेह बाहेर काढले. बचावकार्यात गुंतलेल्या पथकाने अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.हॉटेलमध्ये आग कशी लागली हे शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. सुरुवातीच्या तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे.
परंतु आगीचे खरे कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच कळेल. आगीच्या घटनेप्रकरणी पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी राज्य सरकारला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
जखमींना आवश्यक ती मदत देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबद्दलही त्यांनी म्हटले आहे.