शिरूर तहसीलदारांच्या आदेशाला विरोध; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

1 min read

शिरूर दि.३०:- शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका वादग्रस्त रस्त्याच्या खुल्या वापराबाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला स्थानिक चार व्यक्तींनी थेट विरोध दर्शवून प्रशासनालाच आव्हान दिले.याप्रकरणी संबंधित चौघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तलाठी प्रमिला नागेश वानखेडे (वय ४२, रा. खराडी बायपास, ता. हवेली) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २८ एप्रिलला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शिरसगाव फाटा ते पिंपळसूटी या रस्त्याच्या तात्पुरत्या खुल्या वापरासंदर्भात तहसीलदार शिरूर यांनी स्पष्ट आदेश दिला होता. त्यानुसार फिर्यादी व प्रशासकीय अधिकार्यांनी संबंधित आरोपी ताराबाई पोपट भोईटे, खंडू पोपट भोईटे, महेश पोपट भोईटे आणि दादा पोपट भोईटे (सर्व रा. शिरसगाव काटा) यांना रस्ता खुला करण्याची विनंती केली; मात्र आरोपींनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाच्या आदेशास विरोध केला होता. त्यावेळी आरोपी खंडू भोईटे याने उघडपणे सांगितले की, आम्ही कोणाचाही आदेश पाळणार नाही. आमची जमीन मोजणी होईपर्यंत आम्ही रस्ता मोकळा करणार नाही. तुम्हाला काय ते गुन्हा दाखल करा. यावेळी इतर आरोपींनीही यास दुजोरा दिला. या प्रकारामुळे तहसीलदारांच्या आदेशाचा थेट अवहेलना झाल्याने, संबंधित चार जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस हवालदार शिंदे हे तपास करत असून या प्रकरणाच्या तपासासाठी प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजाळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाचे आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाई कशी होऊ शकते, याचे ठोस उदाहरण निर्माण झाले आहे. शासकीय आदेशांना विरोध करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणार्यांविरुद्ध पोलीस यंत्रणा तत्पर आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!