उसाची एफआरपी वाढली, साखरेची एमएसपी कधी वाढणार ?

1 min read

मुंबई दि.२:- केंद्र शासनाने गाळप हंगाम २०२५- २६ साठी उसाची एफआरपी १५० रुपये प्रति टनाने वाढवून आता ती ३५५० रुपये प्रत्येक क्विंटल केली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे . विस्मा त्याचे स्वागतच करते, मात्र केंद्र सरकारने साखरेची एमएसपी सुद्धा वाढवणे आवश्यक असल्याचे विस्माचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी म्हटले आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोग, ज्यांच्या शिफारशीवरून केंद्र सरकार ऊसाची एफआरपी वाढवते त्या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने प्रत्येक वर्षीच्या आपल्या अहवालात एफआरपी वाढवत असताना त्या प्रमाणामध्ये साखरेची एमएसपी सुद्धा वाढवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकार एफआरपीचा निर्णय घेताना पद्धतशीरपणे एमएसपीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहेत. एफआरपीची किंमत गेल्या सहा वर्षात दरवर्षी वाढवली गेली, मात्र गेल्या सहा वर्षात साखरेची एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत वाढवली नाही. ज्यावेळेस ऊसाची एफआरपी २७५० रुपये प्रति टन होती त्यावेळेस साखरेची किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी २९०० रुपये होती. त्यानंतर फक्त एक वेळेस एमएसपी मध्ये वाढ करून ३१०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली. त्यानंतर २०१९ पासून एमएसपी मध्ये वाढ झालेली नाही. आज ही साखरेची एमएसपी ३१०० आहे व ऊसाची एफआरपी मात्र आता ३५५० रुपये झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या एफआरपी प्रमाणे उसाची किंमत अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते व एफआरपी अदा करणे अपरिहार्य राहते. त्यामुळे आज साखर कारखान्यांच्या कडील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे व संचित तोट्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.विस्माच्यावतीने केंद्र सरकारला एकच विनंती आहे कृषी मूल्य आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे एफआरपी ज्या प्रमाणात वाढवली जाते त्या प्रमाणात एमएसपी वाढ जाहीर करण्यात यावी.गेल्या सहा वर्षातील एमएसपी वाढीतील फरक व आज प्रती क्विंटलचा उत्पादन खर्च लक्षात घेता आज साखरेची एमएसपी किमान ४२०० रुपये प्रतिक्विंटल होणे अपेक्षित आहे.तसेच सध्या थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती मुळे साधारण प्रत्येक साखर कारखान्यात उसाचा वापर २५ टक्के पर्यंत इथेनॉल निर्मितीकडे वळलेला आहे.त्यामुळे इथेनॉलची सुद्धा किंमत ही एफआरपी किमतीच्या वाढीशी निगडित करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आज ६० रुपये प्रति लिटर असणारी बी मोलासेस पासूनच्या इथेनॉल ची किंमत किमान ७० रुपये प्रति लिटर होणे आवश्यक आहे. तरच साखर कारखान्याच्या प्रति लिटर इथेनॉलचा उत्पादन खर्च निघेल. म्हणून विस्माच्यावतीने आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की तातडीने साखरेची एमएसपी ४२०० रुपये प्रतिक्विंटल व इथेनालची किंमत ७० रुपये प्रति लिटर करून वाढीव एफआरपी बरोबर या दोन्ही निर्णयाची घोषणा तातडीने करावी तरच देशातील साखर उद्योग जिवंत राहील. अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी सशक्त करण्याच्या प्रयत्नात त्याचा मुख्य गाभा असणारा साखर कारखाना मात्र नेस्तनाबूत होईल व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा प्रचंड अडचणीमध्ये येईल याचे भान केंद्र सरकारने ठेवणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे