रांजणगाव कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर; स्थानिक आक्रमक; खासदार डॉ अमोल कोल्हेंची पाहणी
1 min read
रांजणगाव दि.२३:- रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे. यामुळे आसपासच्या गावांतील पाण्यात निकेल, कॅडमिअम, लीड यांसारखे धोकादायक घटक मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.MEPL कंपनीच्या या बेजबाबदार कारभारामुळे अण्णापूर, निमगाव भोगी, कारेगाव, फलकेमळा, सरदवाडी, ढोकसांगवी अशा अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे, शेतीच्या पाण्याचे जलस्रोत प्रदूषित झाले असून यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक झाली आहे.
पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्यामुळे अनेक गावांतील नागरिकांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार आज दि.२३ याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना डॉ.कोल्हे यांनी खालील सूचना दिल्या :
– प्रदूषण नियंत्रण महामंडळाने MEPL कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची तपासणी करावी. तसेच, या सांडपाण्यावर बाहेर पडण्यापूर्वी काय प्रक्रिया करण्यात येते याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा.- कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून परिसरातील मृदेच्या गुणवत्तेचा अहवाल तयार करावा.
– MEPL च्या बेजबाबदारपणामुळे नापीक झालेल्या जमिनींचे पुनरुज्जीवन कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव तयार करणे व याची जबाबदारी MEPL ने घेणे.- शिरूर पंचायत समितीच्या माध्यमातून प्रदूषणामुळे मृत झालेले जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करणे.
वास्तविकता : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांना निर्बंध असूनही ही कंपनी रासायनिक प्रक्रिया उद्योग करत आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीला नेहमीच क्लीन चीट दिली जात आहे.
याबाबत माझा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असून माझ्या जीवाभावाच्या माणसांना या जीवघेण्या संकटातून मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे कोल्हे यांनी या वेळी सांगितले.