पहलगाम मध्ये नाव, धर्म विचारून घातल्या गोळ्या; डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश; सुरक्षा यंत्रणा पथके चारही दिशांना

1 min read

नवी दिल्ली दि.२३:- पहलगाम येथील हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पर्यटकांना नाव, धर्म विचारून गोळ्या घातल्याचे समोर आल आहे. मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे.अनुच्छेद ३७० हटविण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात येतो. ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ अशी ओळख असलेल्या राज्यात यंदा प्रथमच देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असताना मंगळवारी पहेलगाम शहरापासून सहा किलोमीटरवरील बैसरन या गवताळ पठारावर अतिरेक्यांनी हा नियोजित हल्ला केला.मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असताना किमान पाच अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. पर्यटकांना टिपून लक्ष्य करण्यात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला. मात्र मोकळे मैदान असल्यामुळे पर्यटकांना आडोसा घेण्याचीही सवड मिळाली नाही. गोळीबार करून अतिरेकी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिस दाखल झाले. अतिरेक्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणांची पथके चारही दिशांना रवाना करण्यात आली आहेत. बंदी घातलेल्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची हस्तक असलेल्या ‘द रेसिडन्स फ्रंट’ (टीआरएफ) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे