जुन्नर तालुक्यात गावागावांत रानमेवा दाखल;करवंदे उत्पादनात ५० टक्के घट; यंदा दुप्पट भाव
1 min read
जुन्नर दि.२३:- यंदा बदलत्या हवामानामुळे करवंदाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाली असल्याचे यंदा करवंदाच्या दरात दुप्पट भाव वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १० रुपयाला दिली जाणारी करवंदे आता २० रुपयाला दिला जात आहे. ही करवंदे मोजून मापून पानांमध्ये ठेऊन विकली जातात.चैत्र महिन्यापासून आंबटगोड करवंदांच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. आदिवासी जंगलातून ही करवंद तोडून आणून बाजारात विकतात. या करवंदांना डोंगरची काळी मैना म्हणूनही ओळखले जात असून, ही काळी मैना विक्रीसाठी जुन्नर तालुक्यात बाजारात दाखल झाली आहे.
माळशेज परिसरात पर्यटन स्थळे असल्याने पर्यटकांची संख्या वाढली असल्याने कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा तसेच पुरुष-महिला गल्लीबोळातून, गावागावांतून रानमेवा विकताना पाहायला मिळत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणात करवंदे उपलब्ध होत आहेत.
करवंदामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाण असल्याने हाडांसाठी देखील करवंदे उत्तम आहेत. करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते.
करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सेंट्रिक अॅसिड असल्याने उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर पुरुष-महिला गावागावांतून रानमेवा विकताना पाहायला मिळत आहेत. डोंगराळ व निसर्गरम्य परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रानमेव्याची आवक आहे.
सध्या रानमेवा बहरल्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तसेच आदिवासी बांधव गावागावांमध्ये करवंद अशी आरोळी देत डोंगराचा रानमेवा भली मोठी पाटी घेऊन २० रुपयांना परडीप्रमाणे विकताना दिसत आहेत.