साईकृपा चे उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी दशक्रियेत केले २०० झाडांचं वाटप

बेल्हे दि.२२: – जुन्नर बाजार समितीचे माजी सभापती व बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे यांचे वडील स्वर्गीय रामभाऊ कृष्णाजी बोरचटे यांच्या दशक्रिया विधीचे औचत्य साधून, साईकृपा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी जवळपास २०० चिंच व आवळा या देशी झाडांच्या रोपांचे वाटप करून एक वेगळा पायंडा पाडला व पर्यावरणाला अनुकूल अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला.रविवार (दि.२०) रोजी बेल्हे येथील दशक्रिया घाटावर कै.रामभाऊ बोरचटे यांची दशक्रिया संपल्यानंतर
त्यांच्याबरोबर सावलीसारखे असणारे सावकार पिंगट यांनी रामभाऊ बोरचटे यांची सदैव आठवण राहावी आणि सध्याचे वातावरण पाहता प्रचंड आग ओकणारा सूर्य, कमी होत चाललेली झाडांची संख्या, त्यामुळे होणारा उष्माघाताचा त्रास, वातावरणातील कमी होणारे ऑक्सिजनचे प्रमाण, होणारे प्रदूषण याला काही प्रमाणात आळा बसावा,
तसेच जागतिक तापमान वाढीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धन करणे गरजेचे आहे, अशा घोषणा आपण सर्वत्र ऐकतो, पाहतो व वाचतो परंतु बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात या न्यायाने प्रत्यक्षात त्यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही,
परंतु सावकार पिंगट यांनी ही योजना प्रत्यक्षात आणत २०० चिंच व आवळा या देशी झाडांच्या रोपांचे वाटप करून, त्या माध्यमातून स्वर्गीय रामूदादा यांच्या स्मृती सदैव जिवंत राहाव्यात, हा एक उद्देश समोर ठेवला असून, झाडे जगविणाऱ्यांचा जाहीर सत्कार करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
त्यांच्या या उपक्रमाचे दशक्रिया विधीला आलेल्या सर्वच मान्यवरांनी कौतुक केले असून भविष्यामध्ये आपण वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पिंगट यांनी सांगितले.