नैसर्गिक मध होतोय दुर्मिळ; वणवा,उष्णता,वृक्षतोड, प्रदूषण,महागाई बनतायत मोठ्या समस्या
1 min read
जुन्नर दि.२२:- जुन्नर तालुक्यात डोंगरांना लागणाऱ्या आगी, सततची वृक्षतोड, पाण्याचा तुटवडा यामुळे वृक्ष कमी होत आहेत. याचा परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येते. झाडांची संख्या कमी झाल्याने मधमाश्यांचा आश्रय हिरावला गेला आहे. त्यामुळे माश्यांना मधाकरिता पोळे घालता येत नाही. परिणामी, मधाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वामध्ये तो एक चिंतेचा विषय ठरत आहे. नैसर्गिक मध मिळत नसल्याने भेसळयुक्त मध ग्राहकांना मिळत आहे. ओरिजनल मध असल्याचं सांगून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. जुन्नर तालुक्यात दारोदारी सध्या भेसळयुत मध विकण्याचे प्रमाण वाढले आहे.
जुन्नर तालुक्यात जंगल भागाला लागून असलेली काही गावे नैसर्गिक वनसंपदेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, वातावरणातील बदल, मानवनिर्मित प्रदूषण व वृक्षतोड यामुळे मधमाश्यांची संख्या घटल्याने तसेच मधमाशी पालन करून मधनिर्मिती उद्योग चालविला जात नसल्याने नैसर्गिक मध मिळणे दुरपास्त होत आहे.
सर्दी, खोकला यासारख्या आजारांवर प्राथमिक उपचार म्हणून मधाचा वापर केला जातो. ग्रामीण भागासोबतच शहरातही मध खरेदीला प्राधान्य देतात. सर्वसामान्य जनतेला मिळणारे मध स्थानिक जंगलातून गोळा केले जाते. नैसर्गिक मधाचा सर्वसामान्यांबरोबरच श्रीमंत लोकही आवडीने खरेदी करतात.
पण, हे चविष्ट मध दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले भुईसपाट होत आहेत. परिणामी, जंगलात वास्तव्य करणाऱ्या मधमाश्यांची संख्या कमी झाली असून, याचा परिणाम अनेकांच्या रोजगारावर होत आहे.
तसेच शेतामध्ये कीटकनाशक फवारणीचा परिणामही मधमाश्यांची संख्या कमी करीत आहे. जंगलांना लागणाऱ्या वणव्यामुळे वनसंपत्ती धोक्यात आली आहे.
————–
चौकट
झाडे वाचवण्याची गरज
जळाऊ लाकडाला राज्यात मोठी किंमत येत असल्याने जंगले नष्ट होऊन मधनिर्मितीवर यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. तसेच निसर्गाचा लहरीपणा, मानवनिर्मित अडथळे यामुळे मधमाश्यांच्या जाती नष्ट होत आहेत. तेव्हा मधमाश्यांना वाचविण्यासाठी सर्वप्रथम जंगले व शेतकऱ्यांनी झाडे वाचविण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले भुईसपाट होत आहेत. परिणामी, जंगलात वास्तव्य करणाऱ्या मधमाश्यांची संख्या कमी झाली आहे.
———–
प्रतिक्रिया
“पूर्वी मधमाश्यांचे पोळे हमखास कुठे ना कुठे दिसायचे आणि मध चाखायला मिळायचे. पण, सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात लोकसंख्यावाढीने औद्योगिकीकरण झाल्याने झाडाची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, मधमाश्यांचे पोळे क्वचितच कुठेतरी पाहायला मिळते.”
शामराव बढे
नगदवाडी
———–
प्रतिक्रिया
“बोरी बाभळीच्या झाडांवर मधमाशी चे पोळे असते परंतु झाडांची संख्या कमी झाल्याने मधमाश्यांचे घर नाहीसे होत आहे. वाढते प्रदूषण, तापमान, औद्योगीकरण, वणवा यांमुळे सर्वच प्राण्यांचे हाल होत आहेत.”
रमेश खरमाळे
निसर्गप्रेमी ,जुन्नर
———–
प्रतिक्रिया
“मधुमक्षिपालन करणे जुन्नर तालुक्यामध्ये कठीण होत चालले आहे. सध्या शेतकरी पिकावर मोठ्या प्रमाणात फवारणी करत असल्यामुळे मधुमक्षि पालन करणे अवघड झाले आहे. त्यामुळेच नैसर्गिक मधमाश्या पोळे दिसणे कठीण झाले आहे.”
शांताराम वारे, मधुमक्षी पालन करणारे शेतकरी,ओतूर