जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी; महामार्ग बंद, रस्ते खचले; मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू

1 min read

श्रीनगर दि.२०:- जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू – काश्मीरच्या रामबनमध्ये पूर आला असून, यात ४० घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू असून, यातून १०० नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपीट झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन आणि वाहतुकीकरिता प्रतिकूल वातावरण झालं आहे. अशा परिस्थितीत प्रवासापूर्वी नियोजन करण्याचा प्रशासनानं सल्ला दिला आहे. वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग अजूनही बंद आहे. संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पाऊस पडत आहे. काश्मीर खोऱ्यात दोन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात मुसळधार गारपिटीमुळे शोपियान, त्राल, पुलवामा, कुपवाडा भागातील सफरचंद बागांचं नुकसान झालं आहे.उधमपूरचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. ज्यात त्यांनी नागरिकांना धीर दिला आहे. काल रात्री रामबन परिसरात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. यातून १०० जणांना वाचवण्यात आले आहे. मात्र, तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ४० हून अधिक कुटुंबाचे नुकसान झाले असून, बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. ढगफुटीत दोन हॉटेल, दुकाने आणि काही घरांचं नुकसान झालं. सततच्या पावसामुळे बागना येथे घर कोसळून दोन मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला. १०० हून अधिक लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग ५ बंद आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे