साखरेचे दर वाढण्याची शक्यता; उत्पादनात १८% घट

1 min read

नवी दिल्ली दि.१९:- यावर्षी आतापर्यंत साखरेचे उत्पादन २५.४९ दशलक्ष टन झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत झालेल्या साखरेच्या उत्पादनापेक्षा हे उत्पादन १८ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे देशातील साखर पुरवठा संतुलित राहावा यासाठी उपाययोजना करण्याची गरज वाढली असल्याचे दिसून येते.इंडियन शुगर बायोएनर्जी अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या साखर कारखानदारांच्या संघटनेने ही माहिती जारी केली आहे. या संघटनेने सांगितले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या साखरेचे उत्पादन जास्त प्रमाणात घेणाऱ्या राज्यात साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात घट झाली असल्याचे दिसून येते.या संघटनेने सांगितले की, महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा साखर उत्पादक प्रदेश आहे, मात्र महाराष्ट्रातील साखर उत्पादन १५ एप्रिल पर्यंत कमी होऊन केवळ ८.०७ दशलक्ष टन इतके झाले आहे.गेल्या वर्षी १५ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात १०.९४ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते.यावर्षी इथेनॉल उत्पादनासाठी ३.५ दशलक्ष टन साखर उपलब्ध केली जाणार आहे. गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनासाठी २.१५ दशलक्ष टन साखर उपलब्ध करण्यात आली होती. इथेनॉल निर्मिती वाढविण्याची गरज केंद्र सरकारने व्यक्त केल्यामुळे ही साखर उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान मुळात देशातच साखरेचे उत्पादन कमी होणार असल्यामुळे यावर्षी साखरेची निर्यात काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आता ग्रह्यात धरण्यात येऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन या कालावधीत कमी होऊन ९.११ दशलक्ष टन झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे