१ मे पासून जिल्ह्यातील कुठलाही दस्त कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवता येणार

1 min read

पुणे दि.२०:- नोंदणी व मुद्रांक विभागाने वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना पुणे जिल्ह्यात येत्या एक मे पासून राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी संगणक प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर चाचणी घेऊन ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात येणार आहे. त्यानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर अथवा ग्रामीण भागात कुठेही जमिन, सदनिका, दुकान असतील तर त्या दस्ताची नोंदणी जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येणार आहे.राज्यात वाढते नागरीकरण आणि औद्योगीकरण यामुळे जमीन, सदनिका, दुकाने आदी स्थावर मिळकतीच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणीसाठी गर्दी होते. नोंदणी व मुद्रांक विभागाने वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात दि. १७फेब्रुवारीपासून ३२ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे. आता याच धर्तीवर पुणे जिल्ह्यात सुद्धा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून सध्या २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांत मिळून दरवर्षी ६ लाखांपेक्षा अधिक विविध प्रकारांची दस्त नोंदणी होते. हे लक्षात घेतल्यानंतर सरासरी एका दुय्यम निबंधक कार्यालयात दरवर्षी २० ते २ २ हजार दस्तनोंदणीची प्रकरणे होतात. अपुरा कर्मचारी वर्ग आणि दुय्यम निबंधक कार्यालयांची कमी संख्या यामुळे अस्तित्वातील यंत्रणेवर ताण येत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर वन डिस्ट्रीक्ट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना राबविल्यास नागरिकांचा वेळ वाचणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने वन डिस्ट्रीक्ट वन रजिस्ट्रेशन साठी संगणक प्रणालीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. याचसह दुय्यम निबंधकांना आवश्यक ती माहिती देण्यात येत आहे. त्यांच्या काही शंका असतील तर त्याचे निरसन आदींची माहिती देण्याचे काम नोंदणी विभागाकडून करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांन अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात ४८ दुय्यम निबंधक कार्यालय पुणे अथवा पिंपरी -चिंचवड शहरातील जमिन, सदनिका यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार या दोन्ही शहरातील एकूण २७ पैकी कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येतात. तर ग्रामीण भागातील मिळकतींची दस्त नोंदणी त्या तालुक्याच्या हद्दीमधील दुय्यम निबंधक कार्यालयातच नोंदविण्याची सुविधा आहे. वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन नुसार जिल्ह्यातील कोणत्याही भागातील जमिन, सदनिका आणि दुकान यांचा दस्त जिल्ह्यातील ४८ पैकी कोणत्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविता येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे