सोलापूरात धावत्या एसटी बसला आग; बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सर्व प्रवासी बचावले
1 min read
सोलापूर दि.१५:- धावत्या एसटी बसने अचानकपणे पेट घेतल्याने सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला आहे.
कुर्डुवाडी ते अक्कलकोट व्हाया सोलापूर या बसने पेट घेतला. सोलापूरहुन अक्कलकोटकडे जाताना एसटी बसला कुंभारी टोल नाक्याच्या अलीकडे आग लागली. बसमध्ये ४५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून प्रवाशांना सुचित करत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही घटना आज सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कुर्डवाडीहुन अक्कलकोटकडे निघालेली बस सोलापूरला बस आली. सोलापूरहुन अक्कलकोट जाणारी एसटी (क्रमांक एम एच 20 बी एल 4215) ही कुंभारी टोलनाक्याजवळ पोहचली.
अचानक इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना सूचना केली.
बसमध्ये बसलेल्या ४५ ते ५० प्रवाशांनी ताबडतोब बसमधून खाली उतरले. चालकाने माहिती देत सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले.
पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्ररूप धारण केले. सोमवारी सायंकाळी सोलापूर अक्कलकोट महामार्गावर द बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी पोहोचले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता आग वाढतच गेली. यात एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.