आण्यात बिबट्या जेरबंद; शेताला पाणी देताना भर दुपारी शेतकऱ्यावर केला होता हल्ला
1 min read
आणे दि.१४:- आणे (ता.जुन्नर) येथे मक्याच्या शेताला पाणी देत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने भर दुपारी शेतकऱ्यावर झडप घातली होती.या हल्यात किरण तुळशीराम दाते (रा.आणे) हा शेतकरी गंभीर जखमी झाला होता.
त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला होता. सोमवार दि.१३ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. नर जातीचा सुमारे ७ वर्षे वयाचा हा बिबट्या असून सदर बिबट्याची रवानगी माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे. अशी माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली आहे.
हल्ला झाल्यावर मोठ्या शिताफीने शेतकऱ्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले. ही घटना शनिवार दि.५ एप्रिल दुपारी १२ च्या दरम्यान आणे (ता.जुन्नर) शिवारात नळावणे रस्त्यावर घडली होती. त्याच ठिकाणी हा बिबट्या जेरबंद झाला आहे.
यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर समोरून हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या कानाजवळ तसेच डोक्यावर कपाळाच्या वरील बाजूला आणि डोक्यावर मागील बाजूला जखमा झाल्या होत्या.
यावेळी त्यांनी बिबट्याला प्रतिकार करत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला होता. या भागात अजून बिबटे असल्याने येथे पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी गावच्या सरपंच प्रियांका दाते यांनी केली आहे.