जुन्नर, आंबेगाव तालुके दत्तक घेणार; आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

1 min read

जुन्नर दि. १३:- जुन्नर आणि आंबेगाव तालुके दत्तक घेऊन ५ वर्षांचा कृती आराखडा बनवून विकास करण्यात येईल. तसेच आदिवासी बांधवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले.जुन्नर तालुक्यातील सुकाळवेढे येथील आई वरसुआई देवीला अभिषेक केल्यानंतर आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, मंदिर देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय गवारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.मंत्री उईके म्हणाले की, पेसा कायदा २०१४ मध्ये लागू करण्याचे आणि पेसा अंतर्गत असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला ५ टक्के निधी देण्याचे काम शासनाने केले. या अंतर्गत येणारे जिल्हे, तालुके, ग्रामपंचायतींचा विकास होत आहे. अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला मंजूर झालेल्या सर्व निधीचा वापर शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी करण्यात येईल. विविध योजनांचे लाभ थेट लाभहस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने अधिक प्रभावीपणे, गतीने कसे पोहोचतील यासाठी काम करण्यात येईल. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत जलसंपदा, महसूल, वनविभाग आदी विभागांसोबत चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. समाजाला बळ, आत्मविश्वास देऊ, त्यासाठी नियमितपणे येथे येऊन येथील अडी अडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी असलेला जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला असून आदिवासी विकास विभागाकडून त्याअंतर्गत आवश्यक तो निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे