निमगाव सावातील ग्रामगौरव गणपत घोडे काळाच्या पडद्याआड; समाजासाठी झिजलेल्या कार्यकर्त्याला अखेरचा निरोप
1 min read
निमगाव सावा दि.१३:-निमगाव सावा (ता. जुन्नर) गावाच्या सामाजिक, राजकीय, कृषी व सहकारी क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे आणि गावगाड्याचा चेहरा मानले जाणारे गणपत बाळू घोडे यांचे भारती हॉस्पिटल, पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावाने एक निष्ठावान, सुसंस्कृत, कर्तबगार आणि समाजासाठी झिजणारा एक खंबीर आधारवड गमावला आहे.स्वतःची शेती समृद्ध करत शेतीत नवनवीन प्रयोग करणारे, स्वच्छ पेहरावात वावरणारे आणि आपल्या नम्र वर्तनाने प्रत्येक गावकऱ्याच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारे
व्यक्तिमत्व म्हणजे गणपत मामा होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांचे ते कट्टर समर्थक होते. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, स्व. वल्लभ बेनके, बापूसाहेब गावडे यांच्याशी त्यांची जवळीक आणि निष्ठा होती.श्री पांडुरंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे ते २५ वर्षांहून अधिक काळ खजिनदार होते.
दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या स्थापनेतही त्यांचे मोलाचे योगदान राहिले. पांडुरंग दूध उत्पादक संघ स्थापून गावातच दूध विक्रीचे नियोजन करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीस तत्पर राहणाऱ्या या व्यक्तिमत्वाने अनेकांचे संसार जुळवले.
गावात त्यांच्या बैठकीसाठी ठरलेली ठिकाणे म्हणजे श्रीहरी भालेराव यांचे दुकान, पेट्रोल पंप परिसर होती, जिथे गावातील अनेकजण त्यांच्या सोबतीला असत. स्व. कुंडलिक गाडगे, स्व. मगन गाडगे, स्व. मारुती घोडे, विष्णू (आप्पा) गाडगे यांच्यासोबत त्यांनी जुन्या गावगाड्यात मोलाची भूमिका बजावली.
साकोरीचे माजी सरपंच बाळकृष्ण साळवे यांच्याशीही त्यांचे घट्ट स्नेहसंबंध होते.त्यांचे सुपुत्र किशोर घोडे सध्या गावाचे सरपंच आहेत, तर सुनबाई मंगल किशोर घोडे यांनीही सरपंच पद भूषवले आहे. त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी आहे.
अंत्यविधीच्या कार्यक्रमास वेल्हे, टाकळी हाजी, जांबुत, निमगाव सावा, काटाळवेढे, कवठे येमाई परिसरातील मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. स्व. गणपत मामा घोडे यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, सुना नातवंडे असा परिवार असून सोपान भाईक, रामदास भाईक, भानुदास भाईक,
ज्ञानदेव सरोदे, पोपट सरोदे, देविदास पवार दत्तात्रय पवार, शहाजी पवार, रामदास कांदळकर यांचे ते मामा होते. नातेवाईकांमध्ये आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मामांकडे पाहिले जात होते. गणपत मामांच्या निधनाने गावाने एक खऱ्या अर्थाने समर्पित समाजभक्त गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.